एका जागेसाठी अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यातील कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या ८० जागांसाठी होणारी प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी (ता. १३) जिल्ह्यातील ५२ केंद्रांवर पार पडणार आहे. यंदा परीक्षेला १९ हजार ३१० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. एका जागेसाठी तब्बल २४१ विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने परीक्षेतील चुरस वाढली आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रत्येक वर्षी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देण्यात येते. एकत्रित ८० प्रवेशांपैकी ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय कन्नड २५ टक्के जागांवर गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहे.
सकाळी ११. ३० ते १. ३० यावेळेत पेपर होईल. पेपरच्या एक तास आधी विद्यार्थ्यांनी केंद्रावर हॉलतिकीट आणि ओळखपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, निरीक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सुरक्षा, उत्तरपत्रिका व्यवस्थापन, तांत्रिक सुविधा आणि शैक्षणिक नियमांची पूर्तता केली आहे. विद्यार्थी केंद्रावर प्रवेशपत्रासह ओळखीची कागदपत्रे बाळगणे बंधनकारक असून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.















